Saturday 6 January 2018

पदार्थाच्या दृष्य किंवा भौतिक अंगाची पारख कशी करायची? (Understanding the apparent or material facets of Padartha)

दृष्टीआडची सृष्टी पाहणं हे राजाचं लक्षण, त्यातही दूरदर्शी राजाचं लक्षण. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना पहिलं आडवं याव ते भौतिक अंग. मग ते एखाद्या डोंगरावरची माती असो, फुलपाखराची रंगीत कांती असो वा जंगली प्राण्यांची परिसरात मिसळून जाणारी रंगसंगती असो. पदार्थाचे पहिले दिसावेत ते बाह्यरंग पण तरीही दृष्टीआडच राहावेत ते अंतरंग. वरून महाकाय दिसणारा, मोठे सुळे असणारा गजराज प्रत्यक्षात मात्र गवतावर जगावा आणि वरून सोनेरी, आयाळधारी सिंहराजाने मैत्रीपूर्णता दाखवावीशी वाटावी तर तो निघावा नरभक्षी. बाह्यांग व अंतरंग यांच्या संयोगातून प्रगटावं ते पदार्थाचं खरं स्वरूप..पण महादेवाच्या मंदिरात प्रथमत: नंदीचंच दर्शन घेऊन जावं लागतं तद्वतच पदार्थाच्या अंतरंगाचं स्वरूप समजून घेण्याआधी पहावं लागतं ते त्याचं बाह्य स्वरूप...

“विक्रमा आलास पुन्हा मूळपदावर..पुन्हा असं सुरू झालं तुझं..आत एक बाहेर एक..कसे विचित्र विचार करता तुम्ही? बाहेर एक दाखवावं, आत काहीतरी वेगळं असावं असे विचारच कसे रे येतात तुमच्या मेंदूंमध्ये? मागल्या एका  अमावस्येला पदार्थाच्या सहा अंगांची चर्चा करताना तू द्रव्य(substances), गुण(properties), कर्म(actions) ही अंगे मानवाच्या इद्रियांनी जाणून घेता येणारी असतात असं तू म्हणाला होतास..मला सांग की या अंगांमध्ये काही साम्यस्थळे आहेत? पदार्थ धर्मसंग्रहामध्ये काही म्हटलंय या विषयी..”अधीर वेताळ विक्रमाच्या स्कंदांगावर आरुढ होत्साता म्हणाला.

“वेताळा, द्रव्य, गुण आणि कर्म हीच तीन बाह्यांगे. कुठल्याही पदार्थाला जाणून घेताना ती आधीच सामोरी येतात. प्रशस्तपाद म्हणतात

द्रव्यादीनां त्रयाणामपि सत्तासम्बन्ध:, सामान्याविशेषवत्वम्, स्वसमयार्थशब्दाभिधेयत्वम्, धर्म्माधर्म्मकर्त्तुत्वञ्च ||15||
To the three, Substance and the rest, belong the relationship with Being, the character of having communities and individualities, that of being denoted by the word ‘artha’ as a technicality of the Vaisheshika system, and that of being the cause of virtue and vice.
साम्य
द्रव्य (substance)
गुण (properties)
कर्म (Action)
सामान्य (classification)
विशेष (individuality)
समवाय (inherence)
सत्ता सम्बन्ध
(Relationship with being)






सामान्यत्व
(classification)






विशेषत्व
(Individuality)






स्वसमयार्थभिधेयत्व
(Denoted by the word Arth)






धर्मकर्तुत्त्व
(cause of virtue)






अधर्मकर्तुत्त्व
(cause of vice)







अर्थात ह्या बाह्यांगांचा अस्तित्त्वाशी थेट संबंध असतो, त्यांचे वर्गीकरण करता येते, त्यांना काही विशेष म्हणजे वेगळेपण असते, शब्दात मांडू शकू असा त्यांच्या अस्तित्त्वाला काही ‘अर्थ’ असतो, त्यांना काही धर्म व अधर्म कर्तुत्त्व असते.”

“धर्म-अधर्म पुन्हा इथे कसं आलं पुन्हा?”

“वेताळा, मी म्हणलं तसं हा पदार्थ धर्म संग्रह ग्रंथ आहे. धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. याठिकाणी धर्म कर्तुत्व म्हणजे काही नैसर्गिक आचरण..समजा शेकोटीवर वा चुलीवर पाणी गरम करायला ठेवलंय, पाणी गरम झालं. चूल विझवली. तर गरम केलेलं पाणी पुन्हा थंड व्हावं हा झाला पाण्याच्या द्रव्य(substance)-धर्म. पाणी हे द्रावक (solvent) आहे व त्यात काहीही मिसळावं हा झाला त्याचा गुण(property)-धर्म. उंचावरून पडलं तरी पाणी खालीच जावं हा झाला त्याचा कर्म(action)-धर्म. ”
“मग यात अधर्म कुठे आला? काय पाप केलं बिचाऱ्या पाण्याने?”

“अधर्म म्हणजे पाप नाही वेताळा..अधर्म म्हणजे नैसर्गिक वृत्तीपेक्षा वेगळं काहीतरी करणं..पाणी गरम केल्यानंतरही चूल विझवलीच नाही तर पाणी पुन्हा नैसर्गिक थंडपणा प्राप्त करू शकणार नाही हा झाला द्रव्याचा अधर्म. उंचावरून खाली पडू न देता पाण्याला अजून उंचीवर वाहायला लावावं तर तो झाला कर्माचा अधर्म. शिवाय गुरुत्वाच्या अंमलाखाली एखादा पदार्थ घरंगळत येण्याऐवजी तो तसाच अडथळे घालून अडवून ठेवावा तर तो झाला गुणाचा अधर्म..”

“पण हा गुणाचा अधर्म काय कामाचा? तू म्हणतोस त्यावरून तरी वाटतंय की पदार्थाच्या नैसर्गिक वृत्तीला दुसऱ्याने अटकाव करावा तर तो झाला अधर्म..पण हा अधर्म काय कामाचा?”

“हे पहा एखादा गोळा उतारावर सोडावा तर तो झाला गोळ्याचा धर्म. पण समजा अश्या अनेक तोफ गोळ्यांचा उंचावर साठा करायचा असेल, त्यांना खाली जाऊ द्यायचं नसेल, म्हणजे त्यांच्याकडून अधर्म कृत्य घडवायचं असेल तर एखाद्या पेटीत किंवा भिंतीच्या आड ते साठवावे लागतील. म्हणजे ती पेटी त्या गोळ्यांच्या बाबतीत अधर्म कर्तुत्व घडवत आहे. पण जर एखाद्या ओंडक्याने त्या गोळ्यांना उतारावर ढकललं तर ते गोळे गुरुत्वाकर्षणाने मिळालेल्या वेगापेक्षाही अधिक वेगाने पळत सुटतील हे झाले त्या गोळ्यांच्या बाबतीतले धर्मकर्तुत्त्व.”

“म्हणजे विक्रमा या गोष्टींचा कुठेतरी जो कोणी हा पदार्थ वापरतोय त्याच्याशी संबंध आहे.. ”

“होय वेताळा..सत्ता संबंध हाजो शब्द आलाय तो बरंच काही बोलून जातो. पदार्थाची द्रव्ये, त्याचे गुण व त्याच्या हालचाली यांचा त्या पदार्थाच्या असण्या(phase of existence)शी संबंधित आहे. कारण यातून त्यापदार्थाचे व्यक्तिमत्त्व साकारतंय..जसं एखादा सजीव आहे तो चालतोय, बोलतोय. म्हणजे इतर द्रव्यांबरोबरच आत्माही निगडित आहे. आत्मा शरीराला सर्व सोडून गेला तर हे चालणं बोलणं थांबतं, म्हणजेच काय तर आत्माद्रव्य सोडून गेलं तर सजीवाचं पार्थिवात रुपांतर होतं, हेच उदाहरण सत्तासंबंधाचं..”

“पण विक्रमा तुझ्या बोलण्यातून असं काही जाणवतंय की ही तीन बाह्यांगे आत्ताच तू सजीव-पार्थिवाचं उदाहरण दिलंस तशी काही कारणाने निर्माण होतात व नंतर पुन्हा बदलत राहतात..असंच काही आहे का?”

“बरोबर आहे वेताळा. ही बाह्यांगे बदलत राहतात. प्रशस्तपाद म्हणतात
कार्य्यत्वानित्यत्वे कारणवतामेव ‌||16||
The character of being an effect and that of being non-eternal, belong only to those (substances, qualities and actions) that have causes.
दुसऱ्या कशाचातरी परिणाम म्हणून निर्माण होणे आणि निश्चित काळापुरतंच अस्तित्व असणे हे फक्त द्रव्य, गुण व कर्म यांनाच लागू आहे.
साम्य
द्रव्य (substance)
गुण (properties)
कर्म (Action)
सामान्य (classification)
विशेष (individuality)
समवाय (inherence)
कार्य्यत्व
(character of being an effect)






अनित्यत्त्व
(non-eternal)








“म्हणजे काय रे? दुसऱ्या कशाचा तरी परिणाम?”




“आता हे पहा वेताळा. पाणी हे भांड्यात ठेवलंय. आजूबाजूला उष्णता फारशी नाही. म्हणून ते पाणी आपरुपात राहिलं. समजा तेच अतिथंड प्रदेशात नेलं तर त्यापासून बर्फ हे पृथ्वीद्रव्य बनेल. तेच पाणी उष्णतेच्या म्हणजे तेजाच्या संपर्कात आलं तर त्याची वाफ म्हणजे वायुद्रव्य बनेल. म्हणजे द्रव्य हे अंग कायम टिकत नाही. एकदा का द्रव्य बदललं की त्याचे गुण बदलणार. आता तिसरं म्हणजे कर्म किंवा हालचाल..ही तर त्या पदार्थावर म्हणजेच पर्यायाने त्यावर काम कारणाऱ्या द्रव्यांवर अवलंबून असते..”

“अरे थांब, थांब. तू आधी काहीतरी असं सांगितलं होतंस..
क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि ||
To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of having actions, being corporeal, having distance and proximity, and having speed.
स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.

“होय वेताळ महाराज, बलप्रयोग करून इतरांमध्ये हालचाल निर्माण होते व काम करणारं बळ किंवा ते द्रव्य गेलं की ती हालचालही मंदावते व काही काळाने तो पदार्थ एका  जागी स्थिर होतो.”

“म्हणजे विक्रमा, न्यूटन वगैरे जे बाह्यबळ(external force) म्हणतात,  ते हेच की काय?”




“होय वेताळा, फक्त वैशेषिकात ते बाह्यबल वर तू म्हणालास तसं स्थायू, द्रव, वायू, तेज व मन यांच्या संयोगात आल्यावर प्रयुक्त होतं असं सांगितलंय. म्हणजेच एखाद्या वस्तूची हालचाल एक सारख्या गतीमध्ये ठेवायला हे बळ जसे साहाय्य करते तसेच ती हालचाल रोखण्यासाठी सुद्धा हे बळ साहाय्य करते. घर्षण(friction) हा जो शब्द आपण रुढार्थाने वापरतो ते या इतर द्रव्यांनी हालचालीला पायबंद घालण्यासाठी लावलेले बळच असते नाही का?”

“हो, ती वस्तू एका विशिष्ट गतीत राहावी किंवा गती रोखावी म्हणून लावलेली ती बळे म्हणजेच वैशेषिकाच्या बाबतीत ‘अधर्मकर्तृत्व’ करणारी बळेच. आणि एक प्रश्न विक्रमा, ह्या बाह्यांगांच्या अभ्यासात द्रव्य, गुण व कर्म या तिन्हींचा अभ्यास होतो. पण मग यात पदार्थातील नऊ द्रव्यांचा अभ्यास होतो? ”

“नाही वेताळा. प्रशस्तपादांनी याच साठी बहुधा सांगितलं असावं की
द्रव्याश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:  ||18||
The character of subsisting in substances (belongs to substances, qualities and actions) with the exception of eternal substances.
द्रव्य, गुण व कर्म या तिघांना फक्त अनित्य द्रव्यांमध्येच आश्रय मिळतो. म्हणजेच केवळ पृथ्वी, आप, तेज व वायू या द्रव्यांनाच ही तिन्ही अंगे लागू पडतात.”

“अच्छा, म्हणजे यात फक्त बाह्यांगेच कळतात तर. म्हणजे त्या पदार्थाचं खरं स्वरूप जाणून घ्यायला त्याच्या अंतरंगात शिरावं लागणार..वा विक्रमा वा..हे छान होतं..पण आता वेळ संपली..पदार्थाचे अंतर्भाव, अंतरंग जाणून घेण्याविषयी पुन्हा भेटू..हाऽहाऽऽहाऽऽऽ”

पुन्हा निरव शांतता..पुन्हा चिडिचुप..पण वरवरचीच..पुढच्या भेटीसाठी प्रत्येकाचेच अंतरंग आसुसलेले होते..


(क्रमश:)

No comments:

Post a Comment